गुरुपौर्णिमा २०१२

परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध म्हणजेच बापू कधीही कुणाकडूनही कुठल्याही स्वरूपात गुरुदक्षिणा म्हणून काहीही स्वीकारत नाहीत. "मित्रांनो, तुमचे पाप मला अर्पण करा' हेच ते सांगतात. "मी माझ्या मित्रांचा त्यांच्या पापासहित स्वीकार करतो' हे बापुंनी श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रन्थराजात सांगितलेच आहे.
श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रन्थराज प्रथम खण्ड "सत्यप्रवेश' यात चरण 4 मध्ये आम्ही वाचतो की मानवाला जर त्याचे प्रारब्ध बदलायचे असेल, तर त्यासाठी ते प्रारब्ध ज्या रूपात त्याच्या ह्या जन्मात काम करत असते, ते रूप बदलणे आवश्यक असते; आणि ते रूप म्हणजेच त्याचे "मन'. याचाच अर्थ "प्रारब्ध बदलण्यासाठी मनच बदलावे लागते.
मन बदलणे म्हणजेच मनाचे "नम:' करणे. मनाला नम: करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी साधा, सहजसोपा मार्ग आहे- सद्‌गुरुभक्तीचा मार्ग. सद्‌गुरुंच्या चरणधुळीने मनरूपी दर्पण निर्मळ होते, असे सन्तश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींनी श्रीहनुमानचलिसा स्तोत्रामध्ये सांगितले आहे.
सद्‌गुरुतत्त्वाकडून ही चरणधूळ स्वीकारण्यात मानवाच्या अल्प कुवतीमुळे, प्रज्ञापराधांमुळे अनेक अडथळे येत असतात. सद्‌गुरुचरणधूळरूपी कवच नसल्यामुळे मानवाच्या दुष्प्रारब्धाचा नाश होत नाही आणि मनाचे नम:देखील होत नाही. गुरुपौर्णिमेस श्रद्धावान सद्‌गुरुचरणधूळ सहजपणे स्वीकारू शकतो.
सद्‌गुरुतत्त्व मानवाचा समग्र जीवनविकास साधण्यासाठी लाभेवीण प्रेमाने जे अथक परिश्रम घेत असते, त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण राखून शारण्यभावात स्थिर असणाऱ्या श्रद्धावानास सद्‌गुरुचरणधूळ नक्कीच प्राप्त होते. सद्‌गुरुप्रती असणारी कृतज्ञता आणि शारण्य-निश्चय ही दोन नाणी देवयानपथावर चालणारे श्रद्धावान गुरुदक्षिणेच्या रूपात सद्‌गुरुतत्त्वास अर्पण करतात.
गुरुपौर्णिमेला सद्‌गुरुंचे दर्शन घेऊन ही गुरुदक्षिणा श्रद्धावान जेव्हा सद्‌गुरुतत्त्वास अर्पण करतात, तेव्हा सद्‌गुरुचरणधूळ स्वीकारण्यात येणारे सर्व अवरोध दूर होतात आणि अनिरुद्धपणे सद्‌गुरुकृपा श्रद्धावानाच्या जीवनात प्रवाहित होते. गुरुपौर्णिमेस सद्‌गुरुतत्त्वाचे प्रतीक असणाऱ्या त्रिविक्रमाचे दर्शन-पूजन करणाऱ्या श्रद्धावानाच्या जीवनात त्या त्रिविक्रमाचे चरण उमटतात आणि साहजिकच त्या चरणांची धूळ श्रद्धावानास सहजपणे प्राप्त होते. सद्‌गुरुंची प्रदक्षिणा करताना प्रत्येक पावलागणिक पुण्यांच्या राशी प्राप्त होतात.

Categories: Share

Leave a Reply